Sunday, August 23, 2020

स्टॉप स्टॉप स्टॉप... लॉस - 4

स्टॉप स्टॉप स्टॉप... लॉस -           4

शेअर मार्केटमध्ये उडी मारणारा प्रत्येकजण आपल्या हाताला वजनदार मासा लागावा या आशेने उडी मारतो. अन्यथा काठावर कमी व्याजदररुपी एफडी इंटरेस्टचा वरण भात असतोच ना? पण जास्त मिळण्याची अपेक्षा असते म्हणून उडी मारली जाते. उडी मारताना त्यात धोके हे असतातच आणि ते धोके स्वीकारण्याची तयारी असते म्हणून उडी मारणाऱ्याला अधिक परतावा मिळू शकतो.
पण बऱ्याच वेळा असं होतं की शेअर मार्केट मध्ये उडी मारल्यावर त्यातले धोके आणि धक्के बसायला लागतात. आणि मग आपलं मुद्दल घालवून बसलेले अनेक जण , शेअर बाजार हा एक निव्वळ सट्टा आहे असं छातीठोकपणे सांगतात.
सट्टा आणि शेअर बाजारातील ट्रेडिंग / गुंतवणूक यातला फरक मागच्या लेखात सांगितला आहेच. तो एकमेव आणि महत्वाचा फरक म्हणजे - स्टॉपलॉस. आपल्याला होत असलेला लॉस हा थांबवणे किंवा मर्यादित करणे असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. सट्ट्यामध्ये आपण लावलेली बोली चुकल्यास सट्टा लावलेली पूर्ण रक्कम जाते पण सट्टा बरोबर आल्यास काही पटीमध्ये परतावा मिळतो. अर्थात जास्त धोका म्हणून जास्त नफा मिळतो.

शेअर बाजारात मात्र ट्रेडिंग / गुंतवणूक करताना आपल्याला आपली चुकलेली position कट करता येते. उदाहरण - मी अबक कम्पनीचा एक शेअर 100 रुपयांना खरेदी केला. माझ्या अभ्यासावरून मला असं वाटतंय की हा शेअर दोन वर्षात रुपये 150 वर जाऊ शकेल. परंतु काही कारणाने (माझ्या अभ्यासतली चूक किंवा बाह्य परिस्थिती) हा शेअर खाली येऊ शकतो. अशा परिस्थितीत मी किती नुकसान सहन करू शकतो अथवा करावं ती पातळी म्हणजे माझा स्टॉपलॉस. या उदाहरणात आपण तो 80 रुपये असं धरून चालू. म्हणजेच मी 100 रुपयांना खरेदी केल्यावर तो शेअर वर न जाता खाली येत राहिला तर रुपये 80 या किमतीला मी तो शेअर विकून टाकणार आणि 20 रुपयांचा लॉस बुक करणार.
स्टॉपलॉस हा किती टक्के असावा याचे काही ठोकताळे आहेत व प्रत्येकाच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहेत. तरीपण आपल्या एकूण मुद्दलाच्या 10% पेक्षा अधिक रक्कम एका डील/ शेअर मध्ये लावू नये आणि त्या डीलमध्ये 15-20% पेक्षा अधिकचा स्टॉप लॉस असू नये.

म्हणजेच माझ्याकडे गुंतवणुकीसाठी 1000 रुपये असतील तर मी ते कमीत कमी 10 वेगवेगळ्या कम्पनिमध्ये गुंतवले पाहिजेत त्या प्रत्येक कम्पनीत गुंतवलेल्या 100 रुपयांसाठी जास्तीत जास्त 80 रुपयांचा स्टॉप लॉस लावायला हवा. आधी सांगितल्याप्रमाणे हा केवळ ठोकताळा आहे, नियम नव्हे.
वरील उदाहरणात माझी 10 च्या 10 डील जरी चुकली तरी माझ्या हातात लॉस होऊन सुद्धा 800 रुपये परत येतील. 10 पैकी 5 डील बरोबर आली(रुपये 150 ची प्रॉफिट लेव्हल प्रत्येक शेअरमध्ये) आणि 5 चा स्टॉप लॉस झाला तरी मला एकुणात 1150 रुपये मिळतील. रुपये 150 चा नफा. आता असं धरून चालू की 10 पैकी 5 डील मध्ये मी 50 रुपये प्रॉफिट कमावला परंतु उरलेल्या 5 ठिकाणी स्टॉपलॉस पाळला नाही. या केसमध्ये मी कमावलेला सारा नफा उर्वरित चुकलेली डील खाऊन टाकणार आहेत.
किंबहुना माझ्या एका बँकेतल्या मित्राचं उदाहरण याविषयी बोलकं आहे. त्याने इक्विटी आणि फ्युचर्स मध्ये ट्रेड करून दोनेक वर्षात 2 लाखांचे 8 लाख केले. *चारपट*. पोजिशन लॉस मध्ये असताना अधिक खरेदी करणे, स्टॉप लॉस न लावणे इत्यादी चुका त्याच्याकडून होत होत्या पण त्या त्या वेळी नफा मिळत होता. आणि एकदा शेवटी येस बँक फ्युचर्स च्या एका डील मध्ये सगळे पैसे घालवून बसला. होय, सगळे पैसे. ज्या चुका करूनही तो आधी वाचला होता, त्याच चुका त्याला फार महागात पडल्या.

" ट्रेडिंग अथवा गुंतवणूक करताना, स्टॉप लॉस न लावणं हे सट्टा खेळण्यासारखं आहे, मिळतात तोवर मिळतात. जातात तेव्हा सगळे जातात. "

TP (take profit level) आणि स्टॉप लॉस (SL) याचं गुणोत्तर किती असावं याचेही ठोकताळे आहेत. TP हा स्टॉपलॉसच्या कमीत कमी दिडपट तरी असावा. म्हणजे 100 रुपयांची खरेदी आणि 90 रुपयांचा स्टॉपलॉस असेल तर TP कमीत कमी 115 चा तरी असावा. आपल्यापैकी बऱ्याच जणांची हीच चूक होते किंवा झालेली असते. नफा घेताना आपण 10%-20% नफा घेतलेला असतो परंतु लॉस मात्र कट करत नाही. 100 रुपयांचा शेअर 110 मध्ये बुक करून 10% नफा कमावणार आणि दुसऱ्या वेळेस 100 चा शेअर 50 वर आला तरी वर जायची वाट बघत बसणार, असं होतं.
उदाहरणं द्यायला आणि बोलायला खूप सोपं आहे. प्रत्यक्षात आपली पोजिशन कट करताना खूप वाईट वाटतं आणि वेदना होतात. डील चुकल्याचं दुःख असतंच, आणि आपल्या पैशाला मार्केटने घेतलं म्हणून ego सुध्दा दुखावला गेलेला असतो. पण या भावनांवर जो नियंत्रण मिळवतो तोच यशस्वी ट्रेडर होऊ शकतो.

अगदी महाकठीण पण नाही हे. रोजच्या आयुष्यात आपण किती स्टॉपलॉस नकळतपणे पाळत असतो. उदा. 9 वाजेपर्यंत बस मिळाली तर ठीक नाहीतर रिक्षा करून ऑफिसला जाणार, पैसे गेले तरी चालतील पण उशीर करणार नाही. घड्याळातले 9 हा स्टॉपलॉस नव्हे काय? गौरींच्या दिवशी मेथीच्या भाजीचा नैवेद्य असतो, त्यादिवशी मेथीची जुडी चक्क 80-100 रुपयांना सुद्धा बाजारात मिळते. अशावेळी आई सांगते, बाबा रे 40-50 रुपयांची मिळाली तर घेऊन ये नाहीतर दुसरी पालेभाजी करू. हा 50 रुपयांचा स्टॉपलॉस नव्हे काय?

श्रीधर


Saturday, August 22, 2020

शिस्तीचं ट्रेडिंग आणि संभाव्यतांचा (Probability) चा खेळ -3

 

शिस्तीचं ट्रेडिंग आणि संभाव्यतांचा (Probability) चा खेळ -3

मागच्या दोन लेखात मी ट्रेडिंगची शिस्त (trading discipline) या गोष्टीचा वारंवार उल्लेख केला होता. माझं ठाम मत आहे की ट्रेडिंग करताना शिस्तीचं पालन केल्याशिवाय ट्रेडर यशस्वी होऊ शकत नाही. याला जरी आपण ट्रेडिंगची शिस्त असं म्हणत असलो तरी हीच तत्व गुंतवणुकीसाठी पण लागू आहेत. माझ्या एका मित्राशी मागच्या लेखानन्तर काही चर्चा झाली होती. मुळात ट्रेडिंग आणि गुंतवणूक अर्थात इन्व्हेस्टमेंट या वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं मी मानत नाही. जास्तीची जोखीम पत्करून जास्तीचा नफा कमावण्यासाठी प्रत्येकजण मार्केटमध्ये उतरतो. (जास्तीचा नफा हा  सापेक्ष (relative) आहे, तूर्तास आपण तो Bank  FD किंवा बॉण्डपेक्षा जास्त असं समजू).  यालाच आपण high risk high gain म्हणतो. थोडक्यात लॉंग टर्म , लॉंग टर्म असं म्हणणारा इन्व्हेस्टर हा देखील जास्तीचा नफा मिळण्यासाठीच इन्व्हेस्टमेंट करतो ना?. मग फरक तो काय उरला ट्रेडर आणि इन्व्हेस्टर मध्ये?
" A trader is short term investor and an investor is long term trader"

आणि हे शॉर्ट आणि लॉंग टर्म 10 सेकंद ते 10 वर्ष इतकं वेगवेगळं असू शकतं किंबहुना असतं. गम्मत सांगतो, event days ला म्हणजे ज्यादिवशी RBI ची मोनेटरी पॉलिसी किंवा निवडणूक निकाल असले इव्हेंट असतात ते दिवस, मार्केट प्रचंड वेगाने वर खाली हलत असतं.  (volatile असतं). कित्येक वेळेला अशा दिवसात केवळ 5-7 सेकंदात माझी पोजिशन बुक किंवा कट झालेली आठवते.

शॉर्ट टर्म, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, ट्रेडिंग- गॅम्बलिंग या विषयात आपले खूप सारे भ्रम / समजुती असतात. ट्रेडिंग म्हणजेच गॅम्बलिंग ( मटका / जुगार) असा काहींचा ठाम समज असतो. दोन्हीमध्ये एकच आणि महत्वाचा फरक आहे. ट्रेडिंग करताना आपली पोजिशन / डील चुकली तर आपण ती पोजिशन कट करून लॉस बुक  करणं अपेक्षित असतं. आणि ट्रेडर तसं करतात देखील. पण लॉटरी/ गॅम्बलिंग / मटका मध्ये आपण एकदा लावलेली बोली रद्द अथवा कट करू शकत नाही. बाकी रिसर्च आणि अभ्यासाचं वगैरे म्हणाल तर 3 दिवसाच्या क्लास वर लाखो रुपयांची उडी शेअर बाजारात मारणारे महाभाग आहेत आणि probability चा अभ्यास कोळून प्यायलेले अट्टल प्रोफेशनल जुगारी पण या जगात आहेत. 
परत एकदा सांगतो तुमच्या ट्रेडिंग अथवा इन्व्हेस्टमेंटचा पुढे जाऊन जुगार होणार की नाही हे तुमची ट्रेडिंगची शिस्त ठरवते.

एक उदाहरण घेऊ, मी एका बँकेचा एक शेअर 200 रुपयाला खरेदी केला. माझी अपेक्षा आहे (अभ्यासा आधारे) की हा शेअर 3 महिन्यात साधारण 220 ला जाईल आणि मला 10% नफा या डील मध्ये होईल. परंतु काही कारणास्तव आपला कॉल चुकल्यास माझा स्टॉप लॉस हा 190 ला लावलेला असेल. म्हणजे डील बरोबर आल्यास मला 220 रुपये मिळतील आणि डील चुकल्यास 190. याविरुद्ध कुठल्या लॉटरी अथवा मटक्यामध्ये एकदा पैसे लावलर की मग आपण पोजिशन कट करून लॉस बुक करू शकत नाही. आपली डील / आकडा चुकल्यास पैसे शून्य होतात.

हेच वास्तव आधारित उदाहरण पुढे चालू ठेऊ. जानेवारी 2008 साली इंडियन ओव्हर्सिस बँक या nationalised बँकेचा शेअर 200 रुपयाला ट्रेड करत होता आणि आज 12+ वर्षांनंतर तो साधारण 10 रुपयांवर ट्रेड करतो आहे. गेल्या 12 वर्षात अनेक in depth रिसर्च करणाऱ्या संस्थांनी या बँकेच्या शेअर वर buy call दिलेले असणार. (कुणाला शंका असेल तर मी प्रूफ शोधून देईन). अशी 1 नाही 100 उदाहरणं देऊ शकेन.  1000% रिटर्न दिलेली चांगली उदाहरणं पण असंख्य आहेत पण आजचा विषय स्टॉप लॉस आणि शिस्त असल्याने आज ही अशी  उदाहरणं घेतोय. येस बँक, किंगफिशर वगैरे तर आपल्या डोळ्यासमोर आत्ता घडलंय ना? तिथे आपल्यापैकी कुणाची तथाकथित लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असेल ना? भविष्यात कुठल्या कम्पनीचं काय होणार आहे हे आज कुणीच सांगू शकत नाही. आज कितीही चांगली वाटणारी/ चालणारी कम्पनी 10 वर्षांनी कोलमडून पडण्याची शक्यता 0.001% असतेच ना? मी कितीही काळजीपूर्वक सावकाश गाडी चालवली तरी आज गाडी चालवताना माझा अपघात व्हायची शक्यता 0.00001% असतेच ना? अशा तर्क्य अतर्क्य गोष्टी व्हायची शक्यता असते म्हणून आपण स्टॉप लॉस लावायचा असतो. आता विचार करा, इन्शुरन्स हा एक प्रकारे स्टॉप लॉस नव्हे काय? अपघातामुळे/ आजारपणात व्हायचे ते नुकसान होतेच पण इन्शुरन्स असेल तर काही प्रमाणात का होईना त्याची भरपाई होते.

ज्यांनी इ.स. 2000 साली वर उल्लेख केलेल्या शेअर मध्ये 200 रुपये इन्व्हेस्ट केले असतील किंवा ट्रेडिंग साठी 200 रुपये टाकले असतील त्यांचं पुढे काय झालं असेल? त्यापैकी असे लोक ज्यांनी 10/20/50 इत्यादी रुपयांचा स्टॉप लॉस ठेवला असेल तेवढी रक्कम त्यांनी सोडून उरलेली 190/180/150 रुपायांची रक्कम त्यांना पुढच्या ट्रेड अथवा गुंतवणुकीसाठी परत मिळाली असेल. लॉंग टर्म मध्ये पैसे नक्की मिळतात किंवा आपला ट्रेड म्हणजे रामबाणच असतोय अशा भरवश्यावर राहिलेल्यांचे आज 10 रुपये झालेत. सांगायचा मुद्दा हा की ट्रेडिंग असो वा इन्व्हेस्टमेंट , स्टॉप लॉस हा महत्वाचा... ट्रेडिंगच्या शिस्तीतला पहिला आणि महत्वाचा धडा , स्टॉप लॉस पाळणे. स्टॉप लॉस किती ठेवायचा आणि नफा किती ठेवायचा हा प्रत्येकाच्या risk profile अर्थात जोखीम घेण्याच्या क्षमतेवर आणि हातात असलेल्या मुद्दलावर अवलंबून आहे. त्यासाठी ठोकताळे आहेत, ते परत कधीतरी सांगेन.  स्टॉप लॉस ठरवणे आणि ठरवल्याप्रमाणे वागणे हा ट्रेडिंगच्या शिस्तीचा एक भाग झाला. बाकीही बऱ्याच गोष्टी आहेत , त्या आपण येणाऱ्या भागांमध्ये बघू...


शेवटी आपल्या विचारांना खाद्य म्हणून एक कल्पनाविलास करून  बघू. सोनं हे सेफेस्ट असेट आहे असं आपण लहानपणापासून ऐकलेलं असतं.  उद्या अशी एक बातमी येते की अमेरिकेतल्या एका प्रयोगशाळेत परिसाचा  (लोखंडाचे सोने करणारा) प्रयोग यशस्वी होण्याच्या जवळ आहे. जगभरात सोन्याची किंमत 20 टक्क्याने पडते. दोन दिवसांनी बातमी येते की ही अफवा होती व असा काही प्रयोग जगात चालू नाहीये. सोन्याची किंमत आहे तशी हळूहळू वर खाली होत राहते. परत एकदा अशीच परिसाच्या प्रयोगाची बातमी येते, सोने पुन्हा 20% ने पडते. पुन्हा एकदा ती अफवा असल्याचं सांगतात. शेवटी सोनं हे सेफेस्ट असेट आहे असं म्हणत आपण आपल्या लॉकरमधे जीवापाड सांभाळलेल्या असेटवर निर्धास्त होऊन झोपतो. एक दिवस सकाळी उठताना बघतो तर आपला फोन 10000 मेसेजनी हँग झालेला असतो आणि जगातलं सगळं लोखंड सोनं व्हायला लागलेलं असतं. आपल्या लॉकर मधल्या जीवापाड जपलेल्या 30 तोळ्यांचे 30 रुपये पण कोणी त्यादिवशी देणार नसतं...

श्रीधर