शिस्तीचं ट्रेडिंग आणि संभाव्यतांचा (Probability) चा खेळ -3
मागच्या दोन लेखात मी ट्रेडिंगची शिस्त (trading discipline) या गोष्टीचा वारंवार उल्लेख केला होता. माझं ठाम मत आहे की ट्रेडिंग करताना शिस्तीचं पालन केल्याशिवाय ट्रेडर यशस्वी होऊ शकत नाही. याला जरी आपण ट्रेडिंगची शिस्त असं म्हणत असलो तरी हीच तत्व गुंतवणुकीसाठी पण लागू आहेत. माझ्या एका मित्राशी मागच्या लेखानन्तर काही चर्चा झाली होती. मुळात ट्रेडिंग आणि गुंतवणूक अर्थात इन्व्हेस्टमेंट या वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं मी मानत नाही. जास्तीची जोखीम पत्करून जास्तीचा नफा कमावण्यासाठी प्रत्येकजण मार्केटमध्ये उतरतो. (जास्तीचा नफा हा सापेक्ष (relative) आहे, तूर्तास आपण तो Bank FD किंवा बॉण्डपेक्षा जास्त असं समजू). यालाच आपण high risk high gain म्हणतो. थोडक्यात लॉंग टर्म , लॉंग टर्म असं म्हणणारा इन्व्हेस्टर हा देखील जास्तीचा नफा मिळण्यासाठीच इन्व्हेस्टमेंट करतो ना?. मग फरक तो काय उरला ट्रेडर आणि इन्व्हेस्टर मध्ये?
" A trader is short term investor and an investor is long term trader"
आणि हे शॉर्ट आणि लॉंग टर्म 10 सेकंद ते 10 वर्ष इतकं वेगवेगळं असू शकतं किंबहुना असतं. गम्मत सांगतो, event days ला म्हणजे ज्यादिवशी RBI ची मोनेटरी पॉलिसी किंवा निवडणूक निकाल असले इव्हेंट असतात ते दिवस, मार्केट प्रचंड वेगाने वर खाली हलत असतं. (volatile असतं). कित्येक वेळेला अशा दिवसात केवळ 5-7 सेकंदात माझी पोजिशन बुक किंवा कट झालेली आठवते.
शॉर्ट टर्म, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, ट्रेडिंग- गॅम्बलिंग या विषयात आपले खूप सारे भ्रम / समजुती असतात. ट्रेडिंग म्हणजेच गॅम्बलिंग ( मटका / जुगार) असा काहींचा ठाम समज असतो. दोन्हीमध्ये एकच आणि महत्वाचा फरक आहे. ट्रेडिंग करताना आपली पोजिशन / डील चुकली तर आपण ती पोजिशन कट करून लॉस बुक करणं अपेक्षित असतं. आणि ट्रेडर तसं करतात देखील. पण लॉटरी/ गॅम्बलिंग / मटका मध्ये आपण एकदा लावलेली बोली रद्द अथवा कट करू शकत नाही. बाकी रिसर्च आणि अभ्यासाचं वगैरे म्हणाल तर 3 दिवसाच्या क्लास वर लाखो रुपयांची उडी शेअर बाजारात मारणारे महाभाग आहेत आणि probability चा अभ्यास कोळून प्यायलेले अट्टल प्रोफेशनल जुगारी पण या जगात आहेत.
परत एकदा सांगतो तुमच्या ट्रेडिंग अथवा इन्व्हेस्टमेंटचा पुढे जाऊन जुगार होणार की नाही हे तुमची ट्रेडिंगची शिस्त ठरवते.
एक उदाहरण घेऊ, मी एका बँकेचा एक शेअर 200 रुपयाला खरेदी केला. माझी अपेक्षा आहे (अभ्यासा आधारे) की हा शेअर 3 महिन्यात साधारण 220 ला जाईल आणि मला 10% नफा या डील मध्ये होईल. परंतु काही कारणास्तव आपला कॉल चुकल्यास माझा स्टॉप लॉस हा 190 ला लावलेला असेल. म्हणजे डील बरोबर आल्यास मला 220 रुपये मिळतील आणि डील चुकल्यास 190. याविरुद्ध कुठल्या लॉटरी अथवा मटक्यामध्ये एकदा पैसे लावलर की मग आपण पोजिशन कट करून लॉस बुक करू शकत नाही. आपली डील / आकडा चुकल्यास पैसे शून्य होतात.
हेच वास्तव आधारित उदाहरण पुढे चालू ठेऊ. जानेवारी 2008 साली इंडियन ओव्हर्सिस बँक या nationalised बँकेचा शेअर 200 रुपयाला ट्रेड करत होता आणि आज 12+ वर्षांनंतर तो साधारण 10 रुपयांवर ट्रेड करतो आहे. गेल्या 12 वर्षात अनेक in depth रिसर्च करणाऱ्या संस्थांनी या बँकेच्या शेअर वर buy call दिलेले असणार. (कुणाला शंका असेल तर मी प्रूफ शोधून देईन). अशी 1 नाही 100 उदाहरणं देऊ शकेन. 1000% रिटर्न दिलेली चांगली उदाहरणं पण असंख्य आहेत पण आजचा विषय स्टॉप लॉस आणि शिस्त असल्याने आज ही अशी उदाहरणं घेतोय. येस बँक, किंगफिशर वगैरे तर आपल्या डोळ्यासमोर आत्ता घडलंय ना? तिथे आपल्यापैकी कुणाची तथाकथित लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असेल ना? भविष्यात कुठल्या कम्पनीचं काय होणार आहे हे आज कुणीच सांगू शकत नाही. आज कितीही चांगली वाटणारी/ चालणारी कम्पनी 10 वर्षांनी कोलमडून पडण्याची शक्यता 0.001% असतेच ना? मी कितीही काळजीपूर्वक सावकाश गाडी चालवली तरी आज गाडी चालवताना माझा अपघात व्हायची शक्यता 0.00001% असतेच ना? अशा तर्क्य अतर्क्य गोष्टी व्हायची शक्यता असते म्हणून आपण स्टॉप लॉस लावायचा असतो. आता विचार करा, इन्शुरन्स हा एक प्रकारे स्टॉप लॉस नव्हे काय? अपघातामुळे/ आजारपणात व्हायचे ते नुकसान होतेच पण इन्शुरन्स असेल तर काही प्रमाणात का होईना त्याची भरपाई होते.
ज्यांनी इ.स. 2000 साली वर उल्लेख केलेल्या शेअर मध्ये 200 रुपये इन्व्हेस्ट केले असतील किंवा ट्रेडिंग साठी 200 रुपये टाकले असतील त्यांचं पुढे काय झालं असेल? त्यापैकी असे लोक ज्यांनी 10/20/50 इत्यादी रुपयांचा स्टॉप लॉस ठेवला असेल तेवढी रक्कम त्यांनी सोडून उरलेली 190/180/150 रुपायांची रक्कम त्यांना पुढच्या ट्रेड अथवा गुंतवणुकीसाठी परत मिळाली असेल. लॉंग टर्म मध्ये पैसे नक्की मिळतात किंवा आपला ट्रेड म्हणजे रामबाणच असतोय अशा भरवश्यावर राहिलेल्यांचे आज 10 रुपये झालेत. सांगायचा मुद्दा हा की ट्रेडिंग असो वा इन्व्हेस्टमेंट , स्टॉप लॉस हा महत्वाचा... ट्रेडिंगच्या शिस्तीतला पहिला आणि महत्वाचा धडा , स्टॉप लॉस पाळणे. स्टॉप लॉस किती ठेवायचा आणि नफा किती ठेवायचा हा प्रत्येकाच्या risk profile अर्थात जोखीम घेण्याच्या क्षमतेवर आणि हातात असलेल्या मुद्दलावर अवलंबून आहे. त्यासाठी ठोकताळे आहेत, ते परत कधीतरी सांगेन. स्टॉप लॉस ठरवणे आणि ठरवल्याप्रमाणे वागणे हा ट्रेडिंगच्या शिस्तीचा एक भाग झाला. बाकीही बऱ्याच गोष्टी आहेत , त्या आपण येणाऱ्या भागांमध्ये बघू...
शेवटी आपल्या विचारांना खाद्य म्हणून एक कल्पनाविलास करून बघू. सोनं हे सेफेस्ट असेट आहे असं आपण लहानपणापासून ऐकलेलं असतं. उद्या अशी एक बातमी येते की अमेरिकेतल्या एका प्रयोगशाळेत परिसाचा (लोखंडाचे सोने करणारा) प्रयोग यशस्वी होण्याच्या जवळ आहे. जगभरात सोन्याची किंमत 20 टक्क्याने पडते. दोन दिवसांनी बातमी येते की ही अफवा होती व असा काही प्रयोग जगात चालू नाहीये. सोन्याची किंमत आहे तशी हळूहळू वर खाली होत राहते. परत एकदा अशीच परिसाच्या प्रयोगाची बातमी येते, सोने पुन्हा 20% ने पडते. पुन्हा एकदा ती अफवा असल्याचं सांगतात. शेवटी सोनं हे सेफेस्ट असेट आहे असं म्हणत आपण आपल्या लॉकरमधे जीवापाड सांभाळलेल्या असेटवर निर्धास्त होऊन झोपतो. एक दिवस सकाळी उठताना बघतो तर आपला फोन 10000 मेसेजनी हँग झालेला असतो आणि जगातलं सगळं लोखंड सोनं व्हायला लागलेलं असतं. आपल्या लॉकर मधल्या जीवापाड जपलेल्या 30 तोळ्यांचे 30 रुपये पण कोणी त्यादिवशी देणार नसतं...
श्रीधर
No comments:
Post a Comment