Thursday, July 23, 2020

श्रीधर मोटर ड्रायविंग स्कुल अर्थात मी ट्रेडिंग कसा शिकलो - 2

श्रीधर मोटर ड्रायविंग स्कुल अर्थात मी ट्रेडिंग कसा शिकलो - 2

मागच्या लेखात  शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग कसं करावं हे शिकवणाऱ्या क्लासेस विषयी जे मला खटकलं ते मी लिहिलं. मला खात्री आहे की कुणीतरी मार्केटविषयी खरंखुरं शिकवणारं पण असणार. काही क्लासेस मध्ये सत्य आणि पूर्ण महितीपण देत असणार. पण अशांची संख्या वाढायला हवी. मार्केट मध्ये सतत पैसे मिळवणं सोपं नाही, त्यासाठी शिकावं लागतं, स्वतःमध्ये बदल करावे लागतात आणि त्यासाठी कष्ट करावे लागतात हे सर्व मार्केट स्वप्नाळू लोकांना सुरवातीला सांगणं गरजेचं आहे. या प्रोसेस साठी किती वेळ लागेल हे सांगता येत नाही आणि प्रत्येकासाठी हा वेळ वेगवेगळा असू शकतो. कुणी 2 महिन्यात हात जमवू शकेल , कुणी 6 महिने तर कुणाला 1 वर्ष आणि कुणाला ते कधीच जमणार नाही असंही होऊ शकतं. ट्रेडिंगसाठी लागणारा एक प्रकारचा धुर्तपणा / कावेबाजपणा सगळ्यांपाशी असावा असं काही नाही. Market is a zero sum game. कुणाचा तरी प्रॉफिट हा कुणाचा तरी लॉस असतो. त्यामुळे आपण कुणापेक्षा चॅपटर असल्याशिवाय आपल्याला प्रॉफिट आणि त्याला लॉस होऊ शकत नाही.  काहीजण (फार कमी जण) खरंच निसर्गतः सालस भाबडे असू शकतात.

आजच्या लेखात मी ट्रेडिंग कसा शिकलो किंवा कसं शिकवायला हवं असं मला वाटतं याविषयी लिहिण्याचा प्रयत्न करतो. विषय लिहिताना खूप काही सांगावसं वाटतं आणि विषयांतर होतं. कळतं पण लिहिण्याचा मोह आवरत नाही. तरीपण आटोपशीर लिहिण्याचं बघतो .

आपल्यापैकी बरेच जण मोटार ड्रायविंग स्कुल मध्ये चारचाकी गाडी शिकले असतील. कुणी मित्राच्या गाडीवर त्याला शेजारी बसवून हात साफ केला असेल. यामध्ये प्रत्येकाचा गाडीवर हात बसण्याचा वेळ वेगवेगळा होता. कुणी 2 दिवसात जमवलं कुणाला 1 महिना लागला.  या ड्रॅयविंग स्कुल मध्ये 30 दिवस रोज साधारण अर्धा तास आपल्याला प्रत्यक्ष गाडी चालवायला देतात आणि तो ट्रेनर आपल्या शेजारी बसतो आपण गाडी शिकताना. सुरवातीला तर तो आपलं स्टीअरिंग पण धरतो. मला सांगा , आपण गाडी शिकताना आधी थिअरी किती वेळ शिकतो? गाडीच्या इंजिन मध्ये कम्बशन कशाप्रकारे होतं? इंजिन ऑइल कशाप्रकारे काम करतं? इत्यादि प्रशांची उत्तरं आपल्याला सुरवातीला असतात का किंवा असल्याने आपल्या गाडी शिकण्यावर त्याचा फारसा फरक पडतो का?  सांगायचा मुद्दा एवढाच आहे की , गाडी शिकताना आपण गाडीला डायटेक्ट हात लावतो. भले ट्रेनर गाडी चालवत असेल पहिल्या दिवशी पण आपण त्याच्या शेजारी गाडीमध्ये बसलेले असतो, वर्गात नव्हे.  थिअरी तितकीच महत्वाची आहे पण ती गाडीला हात लावल्यावर , गाडी शिकता शिकता आत्मसात करायची.

सध्या या बहुतांशी शेअर मार्केटवाल्या क्लासेस मध्ये काय चालतं तर 10 सेशन पैकी 9 सेशन थिअरी शिकवली जाते ज्यामध्ये शेअर बाजाराच्या उगमापासून ते डेरिव्हेटिव्ह पर्यंत सर्व काही सांगितलं जातं आणि शेवटी 1 तासाचा  डेमो किंवा लकी असाल तर लाईव्ह ट्रेडिंग डेमो दाखवला जातो. झालात तुम्ही एक्स्पर्ट. चालवा आता तुमची ट्रेडिंगची गाडी सुसाट. एक सांगा, जर का ड्रायविंग स्कुलमध्ये पहिले 29 दिवस गाडीच्या उगमापासून ते लेटेस्ट तंत्रज्ञान याबाबत वर्गात शिकवलं आणि शेवटी 1 तासाचा गाडी चालवण्याचा डेमो दिला तर आपण गाडी शिकू शकू काय?  शेअर ट्रेडिंग शिकवणाऱ्या अशाच एका क्लासमध्ये शिकून आलेल्या माझ्या एका परिचिताने मला विचारलेला प्रश्न सगळं भाष्य करून जातो. तो म्हणाला, " मी वर्गात सगळं नीट ऐकलं, शिकलो. त्यांनी सांगितलेल्या कुठल्याशा ब्रोकर कडे DMAT  आणि ट्रेडिंग अकौंट उघडलं आणि उत्साहात शेअर ट्रेडिंगसाठी लॉगिन केलं. लॉगिन केल्यावर त्यांनी शिकवल्याप्रमाणे शेअर खरेदीला गेलो आणि पाहिलं तर दोन दोन प्राईस दिसत होत्या. ( Bid and Offer) मी नक्की कुठल्या किंमतीला खरेदी करायचं हे काही कळेना!!!" . इथेच त्याची गाडी अडली.

हे असं होतं. आता लेखाचा उत्तरार्ध. मी ट्रेडिंग कसं शिकलो.
मला ट्रेडिंग मध्ये हात बसायला 5-6 महिने लागले. हा काळ मानसिकदृष्ट्या फार कठीण गेला. याकाळात आपल्याला ट्रेडिंग का जमत नाही म्हणून स्वतःचा खूप राग यायचा. माझे सिनियर ट्रेडर ज्या मार्केट मध्ये ट्रेड करून दिवसाचे लाखो रुपये कमवायचे त्याच मार्केट मध्ये माझा त्यादिवशी लॉस व्हायचा. चिडचिड व्हायची. कधी जमेल ट्रेडिंग आपल्याला किंवा आपल्याला हे ट्रेडिंग प्रकरण एकुणातच जमेल का असं वाटत रहायचं, खासकरून लॉस झालेल्या दिवशी.
पण... माझी गुरू खमकी होती. पहिले दोन दिवस तिने आम्हाला ट्रेडिंग सॉफ्टवेअर आणि वेगवेगळे ट्रेडिंग स्क्रीन बघू दिले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रेडिंगची मूलभूत शिस्त ( trading discipline) शिकवली गेली, बिंबवली गेली. Trading discipline विषयी पुढच्या लेखात लिहेन.
मग आम्हाला एक पेपर दिला गेला ज्यात 6-7 रकाने होते. त्याला म्हणायचं पेपर  position किंवा पेपर ट्रेडिंग. प्रत्यक्ष ट्रेड न मारता आपण काय ट्रेड करू इच्छितो किंवा काय position आपण घेतली असती ते त्या कागदावर लिहायचं. त्यात वेळ, किती रकमेची position, CMP अर्थात करंट मार्केट प्राईस किंवा माझी खरेदी/ विक्रीची किंमत, माझी अपेक्षित TP ( टेक प्रॉफिट) लेव्हल, माझी SL( स्टॉप लॉस )लेव्हल आणि शेवटच्या कॉलममध्ये मी ती position काय वाटलं/ काय पाहिलं म्हणून घेतली हे थोडक्यात लिहायचं. सुरवातीलाच TP  आणि SL  कसे ठेवायचे हे ट्रेडिंग शिस्त मध्ये शिकवलं होतंच पहिल्या दोन दिवसात. यानुसार पेपर position घेतल्यावर मग मार्केट बघत बसायचं आणि आपली position प्रॉफिट किंवा लॉस मध्ये जाते याकडे लक्ष ठेवायचं. आपली अपेक्षित प्रॉफिट किंवा लॉस प्राईस हिट झाली की तसं त्या पेपरात लिहायचं.
संध्याकाळी किंवा आपलं नशीब खराब असेल तर दुपारीच त्या पेपरचं ऑडिट होणार. हे असंच का केलं ?तस्स का नाही केलं? अशा प्रश्नांची उत्तरं द्यायची. काही ट्रेड्स मध्ये जर ट्रेडिंगची शिस्त मोडलेली दिसली तर मात्र बोलणी खावी लागायची." मला त्यावेळी वाटलं म्हणून केली खरेदी किंवा विक्री " अशा नुसतं वाटलेल्या ट्रेड्सची यथेच्छ धुलाई व्हायची सिनियर्स कडून.
मग या पेपरच्या आधारे हळूहळू प्रत्यक्ष position घ्यायला लागलो मार्केट मध्ये म्हणजे खरंखुरं ट्रेडिंग करायला लागलो. (तरी 7-8 दिवस का होईना पेपर ट्रेडिंग केलं असेल). सुरवातीला अगदी छोटी छोटी position घ्यायचो ( छोटी म्हणजे बँकेच्या दृष्टीने छोटी - हाफ मिलियन डॉलर अंदाजे रुपये 3.5 कोटी मात्र ची मिनिमम ticket size होती). बऱ्याचदा ट्रेडिंग करताना सिनियर डीलर , बॉस लोक शेजारी येऊन फक्त बघत बसायचे, आमच्यावर लक्ष ठेवायचे. मला खात्री आहे की माझ्या पाठीमागे ते माझ्या ट्रेडिंगच, माझ्या ट्रेडिंग स्टाईलचं analysis  करत असणार आणि पुढची रणनीती ठरवत असणार.  हे झालं ट्रेडिंगच ऑन द जॉब प्रशिक्षण. थिअरीसाठी आम्हाला रोज एक छोटा विषय दिला जायचा ज्यावर दुसऱ्या दिवशी कधीही प्रश्न विचारले जायचे. आणि दर शनिवारी अधिक सखोल विषयांवर प्रेझेंटेशन द्यायची घ्यायची. असं हे सगळं 4-5 महिने चालल्यावर आमची गाडी रुळावर यायला लागली आणि ट्रेडिंगवर हात बसायला लागला.

लिहिता लिहिता खूप काही आठवतंय आणि सांगावसं पण वाटतंय पण खूप मोठं झालं हे लिखाण आधीच. हे ड्रायविंग स्कुलचं उदाहरण देण्यामागे आणि माझं ट्रेडिंगच ट्रेनिंग सांगण्यामागे उद्देश हाच की असं काहीसं केल्यावर एक ट्रेडर तयार होऊ शकतो किंवा झाला. याचं प्रोसेसचं over simplification करून दाखवू नये असं वाटतं. माझ्या मते ट्रेडिंग शिकवणे ही प्रत्येकाचा हात धरून शिकवण्याची गोष्ट आहे, अगदी शेजारी बसून नाही जमलं तरी विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणं गरजेचं आहे. क्लासमध्ये एकसाथ 50 जणांना लेक्चर देता येईल पण ट्रेडिंग शिकवणं अवघड आहे. एकलव्य असतात आणि तयार होतात पण अपवादानेच...
शेवटी फक्त एकच सांगावसं वाटतं की या माझ्या ट्रेडिंग शिकण्याच्या प्रवासामध्ये माझी बँक माझ्या पाठीशी कायम उभी होती व शिकताना होणारे लॉस माझ्या बॉसने हसत हसत झेलले. यानिमित्ताने बँकेविषयी आणि ट्रेडिंग शिकवणाऱ्या गुरुविषयी कृतज्ञता.
श्रीधर

मागच्या लेख techwalashri.blogspot.com येथे सापडू शकेल.

No comments:

Post a Comment