Tuesday, July 21, 2020

पैसा झाला मोठा, पासवर्ड श्रीमंत होण्याचा वगैरे वगैरे - 1

पैसा झाला मोठा, पासवर्ड श्रीमंत होण्याचा वगैरे वगैरे...

खरं तर विषय खूप मोठा आहे आणि खूप खूप लिहायचं आहे. पण सुरवात करेन म्हणतो कुठून तरी...
गेली 3-4 किंवा अधिक वर्षं TV वर दुपारच्या वेळात काही गुंतवणूक (मुख्यत्वे शेअर बाजार) वगैरे विषय असलेले कार्यक्रम लागतात. वर उल्लेख केल्याप्रमाणे आकर्षक नावं ठेवल्येत त्यांची. त्या कार्यक्रमाची रुपरेषा साधारण अशी असते की, त्या वाहिनीचा अँकर त्या तथाकथित शेअर मार्केट तज्ञ / गुरू/ प्रोफेसरला काही बालिश प्रश्न विचारतो. मग तो महाभाग अतिशय लोभसवाणी , गोग्गोड उत्तरं देतो आणि आपल्या क्लासची जाहिरात करतो. या उत्तरांची आणि जाहिरातीची बेरीज साधारणपणे अशी असते
1. शेअर मार्केट मध्ये कोणीही (गृहिणी, विद्यार्थी, पार्ट टाइम काम करू इच्छिणारे यांच्यावर अधिक भर) सहज पैसे कमवू शकते.
2. दिवसाचा काही वेळ घालवून तुम्ही काही हजार वगैरे रुपये सहज कमवू शकता.
3. आमचा 3 दिवसाचा क्लास करून तुम्ही सहजपणे वरील गोष्टी साध्य करू शकता.
(सहज हा शब्द मुद्दामच तिन्ही वाक्यात वापरला आहे कारण तितक्याच सहजपणे ते कार्यक्रमात तसं सांगतात) . आणि शेवटी त्यांचे एक-दोन दिवसांचा सेमिनार केलेले विद्यार्थी काही(बाही) बोलतात. एका क्लासवाल्याचा विद्यार्थी तर म्हणाला की पूर्वी मी खूप लॉस करीत असे आता क्लास केल्यावर एकदाही लॉस केला नाही!!!
हे असं आहे.. आताशा असं वाटायला लागलं की यातला मला वाटलेला फोलपणा कुठेतरी मांडला पाहिजे म्हणून हा लेखनप्रपंच...
आता थोडसं माझ्याविषयी सांगतो. चार वर्ष मला माझ्या बँकेच्या ट्रेडिंग डेस्कवर काम करायची संधी मिळाली. मी फॉरेक्स ट्रेडर म्हणून करन्सी (स्पॉट आणि डेरिव्हेटिव्ह) मार्केट मध्ये ट्रेडिंग केलं. यानिमित्ताने मला मार्केट , ट्रेडर आणि मार्केट डायनॅमिक्स जवळून बघता आले. ट्रेडिंग चे हे अनुभव मला समृद्ध करून गेले , त्याविषयी पुढे लिहीन कधीतरी.
मुरलेले ट्रेडर मार्केटविषयी एकच वाक्य म्हणतात - Market is God. मार्केट देव आहे. म्हणजे ते देवाईतकेच अगम्य गूढ आहे. त्याची तपस्या करा  , कष्ट करा, अभ्यास करा तर ते तुम्हाला पावेल. जरा विषयांतर झालं. पुन्हा मूळ मुद्याकडे येतो.
सुरवातीला या कार्यक्रमांकडे मी दुर्लक्ष करत असे. नंतर असं लक्षात आलं की त्या कार्यक्रमातले गुरू / तज्ञ यांचे चेहरे बदलले आहेत पण कार्यक्रमाची रुपरेषा तश्शीच आहे. (नाही म्हणायला करोनामुळे आता प्रत्यक्ष कार्यशाळा ऐवजी वेबिनार होतात )
माझ्या ओळखीच्या काही लोकांनी तसेच माझ्या मेव्हणीने असे काही क्लासेस केले व त्यांचे अनुभव मला सांगितले आहेत.
आता सर्वात महत्वाचा प्रश्न , मार्केट / ट्रेडिंग खरच इतकं सोपं आहे का की कुणीही सहज पैसे कमवू शकतं? याचं सरळ उत्तर- नाही. कुणीही करू शकतं का तर त्याचं उत्तर हो असं आहे. त्याला वयाची, शिक्षणाची अट नाही. पण त्याला अपार मेहनत घ्यावी लागते. ती मेहनत अभ्यास रूपात थोडीफार असते पण किंबहुना त्याहीपेक्षा अधिक मेहनत स्वतःला बदलण्यासाठी लागते. अनुभवावरून सांगतो, मार्केटला सर्वात वावडं कशाचं असेल तर ते इगोचं. ट्रेडर ला यशस्वी होण्यासाठी स्वतःशी लढावं लागतं. साधारणपणे मनुष्य स्वभावाच्या विरुद्ध जाऊन अंगी ट्रेडिंगची शिस्त बाणवावी लागते. स्वतःमधल्या fear आणि greed अर्थात भय आणि हाव यांच्याशी लढावं लागतं.  अनुभवी ट्रेडर लोकं याविषयी अधिक सांगू शकतील.
माझं म्हणणं एवढंच की या लोकांनी स्वतःच्या क्लास ची जाहिरात करता करता मार्केटचं over simplification करून ठेवलंय. आणि हे खूप घातक आहे .अशा लोकांना ज्यांना नुसती स्वप्न दाखवली जातायत पण खरा रस्ता दाखवला जात नाही. (यात ते गृहिणी, विद्यार्थी, फावल्या वेळात काम करणारे वगैरे सगळे आले) . माझ्या माहितीमध्ये असे कितीजण आहेत की ज्यांनी अशा क्लास किंवा अन्य ठिकाणी काही बाही माहिती घेऊन शेअर बाजारात उडी घेतली आणि मुद्दल गमावून बसले आहेत.
माझा या तथाकथित तज्ञांना एकच प्रश्न आहे, बाबांनो तुम्हाला शेअर मार्केट विषयी एवढंच ज्ञान आहे तर हे क्लासेस घेण्यात आपला वेळ का बरं वाया घालवता. महाराष्ट्रात / देशात (विदेशात पण यांचे फॅन अथवा विद्यार्थी असतात म्हणे) फिरफिरून कशाला सेमिनार घेता? (आता वेबिनार घेतात)
लाख रुपये मुद्दल घेऊन दिवसाला हजार सहज कमवू शकतो असं हे सांगतात म्हणजे वर्षाचा साधारण २२५% रिटर्न हं!!! मला त्यातले 25% द्या आणि 200% तुम्हाला ठेवा. माझ्यासारखे किती इन्व्हेस्टर येतील तुमच्याकडे हसत हसत. फक्त ते आमचे २५% गॅरंटीड रिटर्न द्या हं. गेला बाजार 20% द्या, 15% पण चालतील. देताय?
माझी ही वाक्य तद्दन मुर्खपणाची आहेत , कुणीही सांगेल . असं शेअर मार्केट मध्ये किंवा कुठल्याही ट्रेडिंग निगडित गोष्टीमध्ये कुणी गॅरंटी वगैरे देत नसतं. अरे मग तसं नीट सांगा ना तुमच्या कार्यक्रमात आणि विद्यार्थ्यांना. ओरडून ओरडून सांगण्यासारखी गोष्ट आहे ही. जगात कोण असा ट्रेडर आहे ज्याने कधीच लॉस केला नाही . असला तर तो देव! 60 ते 70% अचूक ट्रेड करणारा निष्णात ट्रेडर समजला जातो. म्हणजेच निष्णात ट्रेडर चे सुद्धा 10 पैकी 2-3 ट्रेड चुकतात आणि लॉस मध्ये जातात. खरा ट्रेडर तो ज्याची नफा आणि तोट्याच्या ट्रेडची बेरीज ही नफा (+) राहते. मार्केट मध्ये ट्रेडिंग केलं की लॉस होणारच, तो आटोक्यात कसा ठेवायचा आणि प्रॉफिट कसा वाढवायचा , हे मौल्यवान शिक्षण कोण देणार?
शेवटचं सांगतो,  ट्रेडिंगची कौशल्य (skills such as using candlestick patterns and indicators) आत्मसात करणं ही वेगळी गोष्ट आहे. तितकीच महत्वाची , किंबहुना अधिक महत्वाची आहे ट्रेडिंगची शिस्त. (Trading discipline). कित्येक क्लासेस मध्ये म्हणे स्टॉप लॉस चा ओझरता उल्लेख असतो किंवा नसतो सुद्धा.
अशी इतकी उथळ माहिती देऊन , यातले खाच खळगे नीट न सांगता , या मार्केट मधून सहज पैसे मिळवा असं सांगितलं जातं या सेमिनारमध्ये . यात नक्की पैसे कुणाला मिळतात आणि भलं कुणाचं होत, हे सांगणे नलगे...
श्रीधर

No comments:

Post a Comment