शेअर मार्केटमध्ये उडी मारणारा प्रत्येकजण आपल्या हाताला वजनदार मासा लागावा या आशेने उडी मारतो. अन्यथा काठावर कमी व्याजदररुपी एफडी इंटरेस्टचा वरण भात असतोच ना? पण जास्त मिळण्याची अपेक्षा असते म्हणून उडी मारली जाते. उडी मारताना त्यात धोके हे असतातच आणि ते धोके स्वीकारण्याची तयारी असते म्हणून उडी मारणाऱ्याला अधिक परतावा मिळू शकतो.
पण बऱ्याच वेळा असं होतं की शेअर मार्केट मध्ये उडी मारल्यावर त्यातले धोके आणि धक्के बसायला लागतात. आणि मग आपलं मुद्दल घालवून बसलेले अनेक जण , शेअर बाजार हा एक निव्वळ सट्टा आहे असं छातीठोकपणे सांगतात.
सट्टा आणि शेअर बाजारातील ट्रेडिंग / गुंतवणूक यातला फरक मागच्या लेखात सांगितला आहेच. तो एकमेव आणि महत्वाचा फरक म्हणजे - स्टॉपलॉस. आपल्याला होत असलेला लॉस हा थांबवणे किंवा मर्यादित करणे असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. सट्ट्यामध्ये आपण लावलेली बोली चुकल्यास सट्टा लावलेली पूर्ण रक्कम जाते पण सट्टा बरोबर आल्यास काही पटीमध्ये परतावा मिळतो. अर्थात जास्त धोका म्हणून जास्त नफा मिळतो.
शेअर बाजारात मात्र ट्रेडिंग / गुंतवणूक करताना आपल्याला आपली चुकलेली position कट करता येते. उदाहरण - मी अबक कम्पनीचा एक शेअर 100 रुपयांना खरेदी केला. माझ्या अभ्यासावरून मला असं वाटतंय की हा शेअर दोन वर्षात रुपये 150 वर जाऊ शकेल. परंतु काही कारणाने (माझ्या अभ्यासतली चूक किंवा बाह्य परिस्थिती) हा शेअर खाली येऊ शकतो. अशा परिस्थितीत मी किती नुकसान सहन करू शकतो अथवा करावं ती पातळी म्हणजे माझा स्टॉपलॉस. या उदाहरणात आपण तो 80 रुपये असं धरून चालू. म्हणजेच मी 100 रुपयांना खरेदी केल्यावर तो शेअर वर न जाता खाली येत राहिला तर रुपये 80 या किमतीला मी तो शेअर विकून टाकणार आणि 20 रुपयांचा लॉस बुक करणार.
स्टॉपलॉस हा किती टक्के असावा याचे काही ठोकताळे आहेत व प्रत्येकाच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहेत. तरीपण आपल्या एकूण मुद्दलाच्या 10% पेक्षा अधिक रक्कम एका डील/ शेअर मध्ये लावू नये आणि त्या डीलमध्ये 15-20% पेक्षा अधिकचा स्टॉप लॉस असू नये.
म्हणजेच माझ्याकडे गुंतवणुकीसाठी 1000 रुपये असतील तर मी ते कमीत कमी 10 वेगवेगळ्या कम्पनिमध्ये गुंतवले पाहिजेत त्या प्रत्येक कम्पनीत गुंतवलेल्या 100 रुपयांसाठी जास्तीत जास्त 80 रुपयांचा स्टॉप लॉस लावायला हवा. आधी सांगितल्याप्रमाणे हा केवळ ठोकताळा आहे, नियम नव्हे.
वरील उदाहरणात माझी 10 च्या 10 डील जरी चुकली तरी माझ्या हातात लॉस होऊन सुद्धा 800 रुपये परत येतील. 10 पैकी 5 डील बरोबर आली(रुपये 150 ची प्रॉफिट लेव्हल प्रत्येक शेअरमध्ये) आणि 5 चा स्टॉप लॉस झाला तरी मला एकुणात 1150 रुपये मिळतील. रुपये 150 चा नफा. आता असं धरून चालू की 10 पैकी 5 डील मध्ये मी 50 रुपये प्रॉफिट कमावला परंतु उरलेल्या 5 ठिकाणी स्टॉपलॉस पाळला नाही. या केसमध्ये मी कमावलेला सारा नफा उर्वरित चुकलेली डील खाऊन टाकणार आहेत.
किंबहुना माझ्या एका बँकेतल्या मित्राचं उदाहरण याविषयी बोलकं आहे. त्याने इक्विटी आणि फ्युचर्स मध्ये ट्रेड करून दोनेक वर्षात 2 लाखांचे 8 लाख केले. *चारपट*. पोजिशन लॉस मध्ये असताना अधिक खरेदी करणे, स्टॉप लॉस न लावणे इत्यादी चुका त्याच्याकडून होत होत्या पण त्या त्या वेळी नफा मिळत होता. आणि एकदा शेवटी येस बँक फ्युचर्स च्या एका डील मध्ये सगळे पैसे घालवून बसला. होय, सगळे पैसे. ज्या चुका करूनही तो आधी वाचला होता, त्याच चुका त्याला फार महागात पडल्या.
" ट्रेडिंग अथवा गुंतवणूक करताना, स्टॉप लॉस न लावणं हे सट्टा खेळण्यासारखं आहे, मिळतात तोवर मिळतात. जातात तेव्हा सगळे जातात. "
TP (take profit level) आणि स्टॉप लॉस (SL) याचं गुणोत्तर किती असावं याचेही ठोकताळे आहेत. TP हा स्टॉपलॉसच्या कमीत कमी दिडपट तरी असावा. म्हणजे 100 रुपयांची खरेदी आणि 90 रुपयांचा स्टॉपलॉस असेल तर TP कमीत कमी 115 चा तरी असावा. आपल्यापैकी बऱ्याच जणांची हीच चूक होते किंवा झालेली असते. नफा घेताना आपण 10%-20% नफा घेतलेला असतो परंतु लॉस मात्र कट करत नाही. 100 रुपयांचा शेअर 110 मध्ये बुक करून 10% नफा कमावणार आणि दुसऱ्या वेळेस 100 चा शेअर 50 वर आला तरी वर जायची वाट बघत बसणार, असं होतं.
उदाहरणं द्यायला आणि बोलायला खूप सोपं आहे. प्रत्यक्षात आपली पोजिशन कट करताना खूप वाईट वाटतं आणि वेदना होतात. डील चुकल्याचं दुःख असतंच, आणि आपल्या पैशाला मार्केटने घेतलं म्हणून ego सुध्दा दुखावला गेलेला असतो. पण या भावनांवर जो नियंत्रण मिळवतो तोच यशस्वी ट्रेडर होऊ शकतो.
अगदी महाकठीण पण नाही हे. रोजच्या आयुष्यात आपण किती स्टॉपलॉस नकळतपणे पाळत असतो. उदा. 9 वाजेपर्यंत बस मिळाली तर ठीक नाहीतर रिक्षा करून ऑफिसला जाणार, पैसे गेले तरी चालतील पण उशीर करणार नाही. घड्याळातले 9 हा स्टॉपलॉस नव्हे काय? गौरींच्या दिवशी मेथीच्या भाजीचा नैवेद्य असतो, त्यादिवशी मेथीची जुडी चक्क 80-100 रुपयांना सुद्धा बाजारात मिळते. अशावेळी आई सांगते, बाबा रे 40-50 रुपयांची मिळाली तर घेऊन ये नाहीतर दुसरी पालेभाजी करू. हा 50 रुपयांचा स्टॉपलॉस नव्हे काय?
श्रीधर